नाशिक -राज्यात कोरोनाचा प्रभाव आणखी वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये कर्फ्यू लावण्यात येत असल्याचे संदेश सोशल मीडियातून पसरवले जात होते. मात्र, ही निव्वळ अफवा असून नाशिकमध्ये लाॅकडाऊन अथवा कर्फ्यू लावला जाणार नाही, असे जिल्हाप्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरविणार्याविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची घटलेल्या संख्येत दिवाळीनंतर भर पडत आहे. देशातील गुजरात, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. अहमदाबादमध्ये करोनाची साखळी तोडण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर दिल्लीमध्येही लाॅकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. ते बघता महाराष्ट्र सरकारही जपून पावले टाकत आहे.
जिल्ह्यात कर्फ्यू नाही-
नाशिकमधील करोना परिस्थिती व शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी पालकमंत्री भुजबळाच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली होती. त्या पार्श्वभुमीवर रविवारी सकाळपासून नाशिकमध्ये पुन्हा लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू लागू होणार असे आशयाचे संदेश व्हाटसअप, फेसबुकवर फिरत होते. काही वृत्तवाहिन्याच्या कर्फ्युच्या जुन्या बातम्या शेअर केल्या जात होत्या. त्यामुळे व्यापारी, दुकानदार व सर्वसामान्य नाशिककरांमध्ये सभ्रंमाचे वातावरण निर्माण झाले होते.