नाशिक - चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहित पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता.
आरती सागर पारधी असे या मृत महिलेचे नाव असून 1 जुलै 2020 रोजी सागर पारधी याच्यासोबत आरतीचा विवाह झाला होता. दरम्यान लग्न झाल्यापासून पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत असल्याची माहिती पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
पोलीस उप आयुक्त अमोल तांबे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -रस्ता खोदल्याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा कापला कान; 2 जणांना अटक
काल (शुक्रवार) दिनांक 17 जुलै रोजी मध्यरात्री आरती आणि सागर यांच्यात पून्हा जोरदार भांडण झाले. आरतीचे तिच्या माहेरी एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने सागरने रागाच्या भरात दगडी पाटा आरतीच्या डोक्यात घालून तिला जखमी केले. सागरच्या आई-वडिलांनी तत्काळ आरतीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केले. या घटनेनंतर काही तासात सागर पारधी हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पंचवटीत पोलिसांनी आरोपी सागर पारधी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.