नाशिक - भगूर क्षेत्रात भाजीपाला विकणारे शेतकरी आणि छोट्या व्यवसायिकांकडे पालिकेचे कर्मचारी खंडणी मागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. याविरोधात निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भगूर नगर परिषद हद्दीतील आठवडे बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पालिकेचे ठेकेदार त्रास देत असल्याने संबंधित पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
भगूर मार्केटमध्ये ठेकेदाराच्या मुजोरी विरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा भगूर नगरपालिकेने ठेकेदार विक्रम सोनवणे यांनी मार्केट आठ महिन्यांच्या कालावधीसाठी मार्केटचे कंत्राट दिले होते. मार्चमध्ये याचा कालावधी संपल्याने त्याचे लॉकडाऊनच्या काळात नुतनीकरण करण्यात आले. मक्ता मंजुरीचा आदेश दिल्यानंतर मक्तेदारास बाजारात प्रमुख असल्यासंबंधी पाच ठिकाणी दरपत्रक फलक स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे. ठेकेदाराने भगूर शहरात कुठेही दरपत्रक लावले नसून भाजीविक्रेते व शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित ठेक्याची रक्कम सात लाख दहा हजार रुपये होत आहे.
भगूर मार्केटमध्ये ठेकेदाराच्या मुजोरी विरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा निवेदित भाजीपाला व फळ विक्रेत्यांना ३ रुपये प्रति चौ.मी., हातगाडी वरील फळे, ऊस, शेंगदाणे, धान्य इत्यादी प्रत्येकात तीस रुपये तसेच मिठाई, किराणा, बांगडे दुकाने ३.५० प्रति चौरस मीटर, मासे बोंबिल वाले दुकान ४ रुपये प्रति चौरस मीटरनुसार प्रतिदिन कर आकारण्यात यावा, असा नियम आहे. मात्र ठेकेदाराकडून सक्तीचे ४० रुपये आकारण्यात येतात. ते न दिल्यास पालिका कर्मचारी आणि पोलीस हाकलून लावतात.
याचसोबत बाजार वसुलीमध्ये माल भरणाऱ्या व उतरवणाऱ्या गाड्यांचा समावेश होत नाही. त्यांच्याकडून वसुली करू नये; फक्त नगरपालिका हद्दीत किरकोळ विक्री करणाऱ्या वाहन धारकांकडून वसुली करावी, असे काही मुद्दे करारात अंतर्भूत आहेत. मात्र, शेतकरी व व्यापाऱ्यांकडून अधिकची वसूली करून लूट चालू आहे. याविरोधात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत होती. मात्र, पालिकेने पुन्हा त्याच ठेकेदाराला कंत्राट दिल्याने भाजीपाला विक्रेते नाराज आहेत.
भगूरमधील ठेकेदार व पोलीस यांनी जागेचा वाद निर्माण करून भाजीविक्रेते आणि शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. यानंतर भगूर हद्दीच्या बाहेर जेष्ठ नागरिक शेटे यांच्या खासगी जागेवर मार्केट भरवण्यात येत आहे. ठेकेदार पोलिसांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जबरदस्ती भगूर हद्दीत बसण्यासाठी दबाव आणत आहेत. यातूनच भाजीविक्रेत्यांवर लाठचार्ज होण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे.