नाशिक- किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत आहेत ते सर्व जुने आहेत. माझ्यावर जाणूनबुजून आरोप होत आहेत. निवडणुका जवळ आल्या की माझ्यावर आरोप होतात असे सांगत काही लोकांना काम नसतं म्हणून हे उद्योग करतात, असा सणसणीत टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना लगावला आहे. तसेच आयकर विभागाने आमच्यावर सध्या कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे स्पष्टीकरणही यावेळी भुजबळ यांन केले आहे. शनिवारी(4 सप्टें) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळांचा सोमय्यांना टोला भुजबळ म्हणाले, अशा प्रकारे शिळ्या कढीला उत आणायचं कारण नाही. आम्ही न्यायालयात जे आहे ते सांगतोय. निवडणूक आल्या म्हणून हे चालू आहे, का हे बघावं लागेल. तसेच सध्या न्यायालयात केस सुरू असल्यामुळे हे सगळं सुरू आहे का? हेही बघावे लागेल. मात्र आयकर विभागाने आमच्यावर सध्या कोणतीही कारवाई केलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भुजबळांवरती भष्ट्राचाराचे आरोप केले. सोमैय्या म्हणाले, की आर्म स्ट्रॉंग कंपनीत छगन भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ हे मुंबईतील नऊ मजली घरात राहतात. तो कुणाचा आहे ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. भुजबळांचे घर कुणाचे आहे, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी मला सांगावे, असे आवाहनही सोमैय्या यांनी केले होते. त्या आरोपाल भुजबळ यांनी प्रत्युत्तरादाखल सोमय्यावर निशाणा साधला
कोणी चुकीची टिप्पणी करत असेल तर आम्हाला बोलावं लागेल-
ओबीसी आरक्षणावर बोलताना मला या विषयावर कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र कोणी चुकीची टिप्पणी करत असेल तर आम्हाला बोलावे लागेल. जे निर्णय घेत आहोत ते एकमताने घेत आहोत. कोणावर खापर फोडण किंवा श्रेय देणे हा विषय नाही. इम्पेरिकल डाटा कसा गोळा करता येईल याची माहिती आम्ही घेत आहोत. एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाता कामा नये, अशी अट आहे. इ्म्पेरिकल डेटा यायला वेळ लागत असेल तर निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सरकार विचार करू शकेल, असाही पुनरुच्चार पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केला आहे.