महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक शहर होणार भिकारीमुक्त ; पोलीस आयुक्तांकडून भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण सुरू

शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करत त्यांचे पूनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण

By

Published : May 16, 2019, 7:33 PM IST

नाशिक- धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यासोबतच शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, शहराला मोठया प्रमाणात भिकाऱ्यांचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करत त्यांचे पूनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण

भिकारी मुक्त शहर व्हावे यासाठी यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शहर पोलीसांच्यावतीने एकूण ४ पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. परिमंडळ १ आणि २ यांचा यात समावेश आहे. या सर्वेक्षणात महिला आणि बालकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहराच्या सर्वच रस्त्यावरील भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करून याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. पुढील ८ ते १० दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.

नाशिक शहर पोलीस, सामाजिक संस्थांनी आणि शासनाच्या इतर विभागाचे यात सहकार्य लाभणार आहे. यासंबंधित आपली खरी माहिती पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय भिकाऱ्यांचे पालनपोषण आणि पुढील कारवाईसाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हेल्मेटसक्तीनंतर पोलिसांच्या या नवीन उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक आणि भाविक येतात. मात्र, ह्या भाविकांना आणि पर्यटकांना भिकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. यासाठी देशभरातुन कोटीच्या संख्येने भाविक येतात. यावेळी काहीजण आपल्यासोबत आलेल्या वृद्ध व्यक्तींना इथेच सोडून देण्याच्या घटना घडतात. असे काही वृद्ध जेवण मिळेल म्हणून पंचवटी परिसरात भीक मागताना दिसून येतात. पंचवटी परिसरात भीक मागणारे शेकडो भिकारी आहेत.

नाशिकच्या प्रत्येक सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भमधून आलेल्या कुटुंबाची संख्या अधिक आहे. यातील काहीजण सिग्नलवर गजरे तसेच किरकोळ साहित्य विक्री करतात. मात्र, त्यातीलच काही लहान मुले आणि महिला भीक मागताना दिसून येतात. राहण्यासाठी अनेकांनी वाहतूक बेट, उड्डाणपुलाच्या खाली तसेच मोकळ्या जागेत आपले बस्तान बसवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details