नाशिक - देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर व परिसरात राहणाऱ्या कामगारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दिनांक 10 मे रोजी देण्यात आला. या आदेशान्वये कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक व योग्य त्या कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास संपूर्णता बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात येथील प्रशासनाने कामगारांना काही कळवले नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
उद्योगांनी कामगारांसाठी त्यांच्या आवारातच राहण्याची व भोजनाची सोय करावी, असे आदेश असल्यामुळे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या शिफ्टसाठी कामावर जाणाऱ्या येथील एचएएलच्या कामगारांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे जवळपास एक हजाराहून अधिक कामगारांना घरी परतावे लागले. या प्रकारामुळे कामगारांनी व्यवस्थापन व कामगार युनियन विरोधात संताप व्यक्त केला. पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ओझरच्या एअर फोर्स कॉर्नरवरवर नाकाबंदी करण्यात आली होती.
कामगारांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी जर 10 मे रोजी आदेश दिले होते तर कारखाना व्यवस्थापन व कामगार संघटना गेल्या दोन दिवसापासून बैठकांवर बैठका घेत असतानाही कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर कामगारांना लेखी स्वरुपात किंवा मेसेज द्वारे का कळवले नाही? बुधवारी दुपारपासून लागू झालेल्या नियमांचं पालन करताना पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचे हत्यार उपसले, त्यामुळे सर्व कामगारांना घरी जावे लागले. कामगार युनियन व व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे कामगारांची सुट्टी पडल्याने त्या बदल्यात आम्हाला पगार मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. युनियन पदाधिकाऱ्यांनी कामगारांचा रोष शांत करत पगारी सुट्टी मिळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर एक तासानंतर कामगार माघारी परतले.