नाशिक -मालेगावहून सुरतला जाणाऱ्या सना ट्रॅव्हल्स या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर घटनास्थळी आलेल्या "बॉम्ब शोधक आणि नाशक पथक" यांच्याकडून बसची दोन तास कसून तपासणी करण्यात आली, मात्र एकही आक्षेपार्ह वस्तू न आढळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सुरतला जाणाऱ्या बसमध्ये बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने खळबळ - Anonymous phone with a bomb in the bus from malegaon to surat
मालेगावहून सुरतला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब तपासणी आणि नाशक पथकाकडून दोन तास तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले.
![सुरतला जाणाऱ्या बसमध्ये बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने खळबळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4158151-37-4158151-1566017140844.jpg)
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता मालेगाव येथून सुरतला जाणारी सना ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक 'जी जे 05 झेड 2071' ही प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी निघाली असताना, सुरतहुन एक फोन कंपनीच्या कार्यालयात आला. फोनवरील एका अज्ञात व्यक्तीने बसमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. खासगी ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक रहीम शेख यांनी कंपनीच्या मालकास या प्रकाराची माहिती दिली. ट्रॅव्हलच्या संचालकांनी याची माहिती शहर पोलिसांना कळवली. या तक्रारीची तातडीने दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बसची सुमारे दोन तास तपासणी केली. मात्र तपासाअंती कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला.