नाशिक - भाजपाचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर विविध स्तरांतून पडळकर यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
नाशकात राष्ट्रवादी आक्रमक, पडळकरांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन पडळकरांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कार्यालयाबाहेर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळा समोर ठेवून 'जोडे मारो' आंदोलन केले आणि पडळकरांचा निषेध नोंदवण्यात आला.
पवारांनी बहुजनांवर अत्याचार केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नसल्याचे ते म्हणाले. फक्त छोट्या समूहातील घटकांना भडकवून आपल्या बाजूने करून घ्यायचे, आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे, अशी भूमिका पवारांनी घेतल्याची टीका पडळकरांनी केली. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पवार सकारात्मक नसल्याचे पडळकर म्हणाले. आता या प्रकरणावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर भाजपाने देखील संबंधित प्रकरणातून अंग काढून हे पडळकरांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यंकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारले. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.