नाशिक:राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेच आहे. ( MPSC exam preparation ). काही तरुण एमपीएससीच्या परीक्षेसाठी आठ ते दहा वर्षांपासून तयारी करत आहेत. रिक्त जागा हजारांच्या घरात असताना त्यासाठी अर्ज मात्र लाखोच्या संख्येने येत आहेत. अशात आता वय वाढल्याने या तरुणांना ना नोकरी मिळते आहे ना त्यांचे लग्न होते, यामुळे पालकांची चिंता वाढते आहे. या बाबतीत या क्षेत्रातील तज्ञांचे काय मत आहे हे जाणून घेऊया. ( MPSC exam expert advice )
स्पर्धा परिक्षेच्या तयारीने होतो सर्वांगीण विकास: स्पर्धा परीक्षेची तयारी दहावी-बारावीपासूनच सुरू केली तर विविध पदांची परीक्षा देताना सर्वांना आपली क्षमता किती आहे याचा अंदाज येतो. भविष्यात दुसऱ्या व्यवसायाची किंवा नोकरीची संधी मिळाली तरी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करून तयारी केली तर अधिकारी बनण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते, असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचे म्हणणे आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करताना सर्वांगीण विकास साधला जातो, त्यामुळे असे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, असे तज्ञांचे याबाबतचे मत आहे.
किती वर्षे करावा प्रयत्न? :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी किती वर्ष तयारी करावी याचे नियोजन करणे कठीण आहे.अधिकारी बनण्याची शेवटची संधी केव्हा मिळेल हे त्यावेळच्या तयारीवर अवलंबून असते. तसेच प्रत्येक शेवटची संधी म्हणजेच अधिक अभ्यास आणि अधिक तयारी असल्याने वयोमर्यादा असेपर्यंत प्रयत्न सुरूच ठेवावेत असं सांगतात.