नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आता कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक मध्ये ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा करण्यासाठी एकच टँकर उपलब्ध असून दुर्दैवाने टँकर नादुरुस्त झाला तर शासनाकडे सद्यस्थितीत पर्यायी व्यवस्था नसल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे इथली आरोग्यव्यवस्था एकाच ऑक्सिजन टँकरवर विसंबून असल्याची वास्तव परिस्थिती दर्शवणारा ई टीव्ही भारतचा ग्राउंड रिपोर्ट..
धक्कादायक! नाशकात एकाच टँकरवर ऑक्सिजन पुरवठ्याची मदार; ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट
नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, शहराला सध्या प्रामुख्याने ज्या ऑक्सिजन कंपनीकडून पुरवठा होतो. त्याच्याकडे ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी एकच वाहन आहे. त्यातच एकट्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोरोनाच्या आधीच्या काळात केवळ रोज 35 ते 40 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती, ती आज घडीला तब्बल 450 ऑक्सिजन सिलिंडरवर जाऊन पोहोचली आहे. तसेच इतर हॉस्पिटलमध्ये देखील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
पिनॅकल कंपनी शहरास करते 70 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा-
नाशिक शहरातील पिनॅकल या कंपनी मधून शहरात 70 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा होतो. नाशिक जिल्ह्यात 6 ऑक्सिजन पुरवठा कंपन्या असल्या तरी पिनॅकल कंपनीकडे ऑक्सिजन लिक्विड वाहतूक करण्यासाठी एकमेव ट्रक आहे. या ट्रकच्या माध्यमातून दिवसरात्र ऑक्सिजन लिक्विडची वाहतूक होत असते. पिनॅकल या कंपनीच्या माध्यमातून शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय, मनपा रुग्णालय तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र सद्यस्थितीत जेवढा ऑक्सिजन येतोय तेवढाच पुरवठा केला जात आहे. सर्वच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वितरकांकडे स्टोरेज टॅंक नसल्याचे दिसून आले आहे.
ऑक्सिजन लिक्विडचे भाव वाढले-
नाशिकमध्ये ऑक्सिजनसाठी लागणारे लिक्विड हे मुंबई, चाकण, मुरबाड येथील कंपन्या मधून येत असते. मात्र कोरोनामुळे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ऑक्सिजन लिक्विडची मागणी वाढली असून या कंपन्यांनी लिक्विडचे दर मोठ्या प्रमाणत वाढवले आहेत. कोरोनापूर्वी 9 रुपये क्यूबिक मिटर प्रमाणे मिळणारे लिक्विडचे दर २४ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे ऑक्सिजन वितरकांनी देखील ऑक्सिजन सिलेंडरचे दर काही प्रमाणात वाढवले आहेत.