नाशिक - जिल्ह्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात मोठी साखळी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एकूण तब्बल 24 बनावट प्रमाणपत्र आढळून आलीत. यात काही डॉक्टर, वैद्यकीय अधिकारांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे (Nashik fake medical certificate case). शस्त्रक्रिया कधी झालीच नाही अशा शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याचे उघड झाले असल्याने त्या फायली देखील तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित खाजगी रुग्णालयाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे (committee of health department appointed).
अटकपूर्व जामीनासाठी धावपळ -बनवट वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट उघड झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. त्यातील संशयिताने दिलेल्या माहितीनुसार त्यात अन्य काही वरिष्ठ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्याने गूढ अधिकच वाढले आहे. संबंधित अधिकारी अटकपूर्व जामीनांसाठी तजवीत करीत असल्याचेही चर्चा आहे.
मे महिन्यातच दिले पत्र -पोलीस अधीक्षकांनी बोगस प्रमाणपत्र पडताळणीबाबत पत्र दिले होते. यावर संबंधित डॉक्टरांचा अभिप्राय घेतला होता. त्याचा अहवालही पाठवण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीत प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोषी असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
गुन्ह्याचे कलम वाढणार -पोलीस कर्मचाऱ्यांनी 2019 ते 2022 या कालावधीत बदलीसाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यावेळचे तत्कालीन शल्यचिकित्सक,अतिरिक्त शल्यचिकित्सकांसह प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शासनाची शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कट कारस्थान आणि शासनाची फसवणूक केल्याने कलम वाढणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि ग्रामीण प्रशासनाने निरीक्षक खर्गेंद्र टेंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशासकीय कार्यालयातील मुंबई पोलीस दलात कार्यारत असलेल्या शिपायाची नाशिक ग्रामीण दलात बदली करण्यासाठी अर्ज आला होता. या अर्जासोबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. नमूद आजाराबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पडताळणी केली असता जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या सह्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रमाणपत्र रुग्णालयाचा लिफ्टमॅनने बनवून देत त्यावर वैद्यकीय अधिकारांच्या सह्या घेतल्याचे तपासात समोर आले आहे. तालुका पोलिसांनी संशयित लिपिक हिरा कनोज याला पाच दिवसापूर्वी अटक केली होती. त्यानंतर सिव्हिल कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे याला अटक करण्यात आली आहे.