नाशिक - महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा निकाल आता उच्च न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या गणेश गीते यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. तर, विरोधी पक्ष शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकत उमेदवारी अर्ज भरला नव्हता.
तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेच्या सदस्यांची निवड न झाल्याने सेनेने नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती. त्यानुसार सभापती पदाची निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यान, याविषयावर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावनी पार पडत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया बंद दाराआड पार पडली. मात्र, निकाल घोषित न करता न्यायालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालय यावर पुन्हा सुनावणी घेऊन निर्णय देणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात काय निर्णय होतो, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.