नाशिक -शहरात गेल्या दहा दिवसांपासून रोज 1400 ते 1500 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून ( Nashik Corona Update ) येत असून कोरोनाच्या तिसर्या लाटेत सक्रिय रुग्णांची ( Active Cases in Nashik ) संख्या दहा हजारांच्यावर गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 7 टक्के हून 4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सद्यस्थितीत 390 रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
राज्यासह नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने उसळी घेतली आहे. मात्र, रुग्ण बाधित होण्याचे प्रमाणत अधिक असले तरी तीव्र लक्षणे नसल्याने चिंतेचे कारण नाही. दिलासादायक बाब म्हणजे 96 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच अलगिकरणात राहून उपचार घेत आहे. सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 815 कोरोना बाधित रुग्ण असून केवळ 390 रुग्ण शहरातील महानगरपालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यापैकी 106 रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.