नाशिक- भाजपच्या अमळनेर येथील बैठकीत पक्षांतर्गत वादावादीत राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही तरुणांनी त्यांना चक्क झंडुबाम आणि मलम पाठविला आहे. तरुणांनी पालकमंत्र्यांना लवकर बरे व्हा, पण नाशिकच्या सेवेत रुजू व्हा, असा उपरोधिक सल्ला दिला आहे.
नाशिककरांनी गिरीश महाजन यांना पाठवला 'झंडुबाम', अधिकच्या उपचारासाठी नाशिकला येण्याचे निमंत्रण - झंडुबाम
अमळनेरच्या मारहाण प्रकरणात मुक्कामार लागलेल्या महाजनांवर उपचार करण्यासाठी नाशिककर तरुणांनी महाजन यांना स्पीडपोस्टद्वारे झंडू-बाम पाठविले आहेत.
नाशिकचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी दत्तक नाशिककडे दुर्लक्ष करत भाजपच्या प्रचारासाठी वाहून घेतले, म्हणून नाशिककर तरुणांनी महाजनांवर उपरोधिक टीका केली आहे. अमळनेरच्या मारहाण प्रकरणात मुक्कामार लागलेल्या महाजनांवर उपचार करण्यासाठी नाशिककर तरुणांनी महाजन यांना स्पीडपोस्टद्वारे झंडू-बाम पाठविले आहेत. महाजन यांना अधिकचे उपचार हवे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये उपचारासाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नाशिकच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत महाजन राज्यातील प्रश्नांकडे अधिक लक्ष देत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला डॅमेज करण्यासह भाजपचे बळ वाढविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नाशिकचा विकास दुर्लक्षित राहिला आहे. महाजन यांचे झालेले दुर्लक्ष पाहून नाशिकच्या काही तरुणांनी महाजनवर उपरोधिक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे आवाहन केल्यानंतर नाशिककरांनी भाजपच्या हाती पालिकेची सत्ता सोपवली. परंतु, गेल्या २ वर्षांपासून नाशिकच्या विकास होण्याऐवजी नाशिकचे प्रकल्प अन्यत्र पळवले जात आहेत, असा आरोपही त्यांच्यावर केला.