नाशिक:आडगाव पोलिसांनी काल मध्यरात्री नाशिक बस अपघातातील संशयित चालक रामजी जगबिर यादव (वय 27 राहणार तारागाव तालुका, हांडीया उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. (truck driver arrested). त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 अ 279, 336, 337, 338, 427 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटर वाहन कायदा कलम 184, 134 अ ब अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. काल नाशिकच्या औरंगाबाद रोडवर खाजगी प्रवासी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. (Nashik Bus Accident). या घटनेत बसला आग लागून त्यात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 36 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला होता.
कसा झाला होता अपघात? : 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची (chintamani travels) खाजगी बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. 8 सप्टेंबरला पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर तिला सिन्नर कडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत बसची ट्रकच्या डिझेल टाकीला आग लागून काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.