नाशिक- गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मलाईदार खाती हवे असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे मलईदार खाते कोणते यांचा अर्थ भाजपने महाराष्ट्राला सांगावा, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजपात - तुपसाखरे लाॅन्स येथे काॅग्रेस मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेतलेल्या कारवाई ही सुडबुध्दीने असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांच्यावरील आरोप खोटे असून इंग्रज ज्या पध्दतीने दडपशाही करायचे. त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
राज्यात 'ईडी' चे सरकार असल्याची कबुली - राज्यपालांनी मुंबई बद्दल जे वक्तव्य केले, त्यात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. लोकांमधील चीड डायव्हर्ट करण्यासाठी राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ते भाजपात गेल्यावर कारवाईचे काय झाले हे भाजपने सांगावे. त्यांचे नेमके कोणते शुध्दीकरण केले आहे. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच राज्यात 'ईडी' चे सरकार असल्याची कबुली विधानसभेत फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्ष ठेवायची असा टोला लगावत देशातील जनता या एक दिवस सत्तेतून हद्दपार करेल, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.