नाशिक - जिल्ह्यातील ६ नगरपंचायती आणि २३० ग्रामपंयातींतील ३९३ जागांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार असून रविवारी (दि.१९) सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रशासनाकडून निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त सज्ज असणार आहे.
हेही वाचा -Nashik Update: दहा लाख नाशिककर लसीकरणाच्या पहिल्या डोसपासून दूर
उमेदवारांकडून आश्वासनाचा पाऊस
पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड आणि दिंडोरी या सहा नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी १३० मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदान केंद्रे ही निफाड नगरपंचायतीमध्ये आहेत तर, पेठ व दिंडोरी येथे २३ मतदान केंद्रे आहेत. देवळा, कळवण सुरगाणा येथे प्रत्येकी १७ मतदान केंद्रे असल्याचे जिल्हा निवडणूक कर्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीसह भाजपनेही प्रचाराचा धुराळा उडवला होता. राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. उमेदवारांकडून आश्वासनाचा पाऊस पाडला जात होता. रविवार प्रचाराचा शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केला. सायंकाळी पाच नंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
निकालासाठी महिनाभर पहावी लागणार वाट
नगर पंचयातींच्या निवडणुका २१ डिसेंबरला होणार असल्या तरीही ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने शिल्लक असलेल्या ११ जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रीया होणार असल्याने या ११ जागांची १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतरच १९ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याने सर्वच निकाल हे १९ जानेवारीलाच जाहीर होतील. त्यामुळे, २१ डिसेंबरला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पुढील २९ दिवस निकालासाठी वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा -Vaccination slows down in Nashik : नाशकात लसीकरण मंदावले! नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई