नाशिक -पंचवटी येथील राम रतन लॉज येथील बंद गाळ्याच्या समोरील एका फिरस्ती मजुरावर कटर (ब्लेड)ने गळ्यावर वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे-आठच्या सुमारास घडली. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्रीच संशयीत आरोपी पंडित उर्फ पंड्या उर्फ लंगड्या रघुनाथ गायकवाड (वय ३२, रा. पिंपळद, त्र्यंबकेश्वर) याला ताब्यात घेतले. वीस रुपये दिले नाही म्हणून गळा कापल्याची त्याने कबुली दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. गळ्यावर वार झालेला मजूर जुना आडगाव नाका येथून वाल्मिकनगरातून पायी चालत सेवाकुंज येथे येऊन पडला.
कटरने गळ्यावर वार
या खुनाविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिरस्ती मजूर सुनील (वय ४०) हा मोनू श्यामलाल बनसोड (वय ५१, मूळ रा. जबलपूर थाना, गोरखपूर, हल्ली नाशिक) व बिनेश शुभम नायर (वय ३३, मूळचा केरळ, सध्या पंक्चर काढण्याचे काम करणारा) हे तिघे गेल्या सहा महिन्यांपासून रामरतन लॉजच्या समोरच्या भागात रात्री येऊन झोपत होते. ते शुक्रवारी रात्री तेथे आल्यानंतर तेथे संशयीत पंडित गायकवाड आला, त्याने सुनील याच्याकडे वीस रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून त्याने त्याच्याजवळील कटरने सुनीलच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर वार झालेला सुनील जुना आडगाव नाका येथून वाल्मिकनगरातून पायी चालत सेवाकुंज येथे येऊन पडला.
तपोवनातील उद्यानातून घेतले ताब्यात
पोलिसांना माहिती कळताच जखमी सुनीलला उपचारासाठी पाठविले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो ज्या मार्गाने आला होता, त्या मार्गावर रक्ताचे थेंब पडलेले होते. पोलिसांनी त्याचा माग काढला. अखेर ही घटना रामरतन लॉजच्या समोरच्या भागात घडल्याचे निष्पन्न झाले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोलपंपावर एकजण हात धुवून स्वच्छ करत असल्याचे दिसले. त्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी मोनू बनसोडला ताब्यात घेतले. त्याच्यासोबतचा दुसरा बिनेश नायर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा वार दोघांनी केला नसल्याचे समजले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आणि कपड्यांवरून पोलिसांनी तपास केला. तपोवनातील उद्यानात संशयीत पंडित गायकवाड पोलिसांना सापडला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे व गुन्हे शोथ पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. शुक्रवारी रात्रीच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व स.पो.उ.नि. बाळनाथ ठाकरे, अशोक काकड, पोलीस नाईक सागर कुलकर्णी, दीपक नाईक, राकेश शिंदे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, पोलीस शिपाई श्रीकांत कर्पे, अविनाश थेटे, गोरक्ष साबळे, योगेश सस्कर , घनश्याम महाले, नारायण गवळी, कल्पेश जाधव, राजेश राठोड, कुणाल पचलोरे, अंबादास केदार यांनी या खुनाची उकल केली.