नाशिक - महापालिकेच्या सिटीलींक बसचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फोटो आणि बुडवलेल्या तिकिटांची माहितीही सोशल मीडियावर प्रसिद्ध करणार असल्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले आहे. प्रवाशांकडून कमी पैसे घेऊन तिकीट न देणाऱ्या कंडक्टरवरही दंडात्मक कारवाईसह त्यांना तुरुंगात टाकणार असल्याची माहितीही यावेळी महापालिका आयुक्तांनी दिली आहे.
सिटी लिंक अॅप बससेवेच्या संचलनासाठी एनएमपीएमएल कंपनी स्थापन केली असून मनपा आयुक्त त्याचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे घेत पवार यांनी पहिल्याच बैठकीत बस चालवणाऱ्या आणि वाहक पुरवणाऱ्या ठेकेदारांना जोरदार दणका दिला आहे. काही महिन्यात बस सेवेला प्रचंड प्रतिसाद दिसत असला, तरी त्याचे परिवर्तन उत्पन्नवाढीसाठी दिसत नव्हते. ही बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी गुप्तपणे नेमके काय सुरू आहे, याची माहिती घेतली. त्यात धक्कादायक बाब पुढे आली आहे. सिटी लिंकच्या माध्यमातून एकूण 196 बस रस्त्यावर धावत असून त्यासाठी 592 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी 35 तपासणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर मासिक सात लाख याप्रमाणे वर्षभरात 84 लाख रुपये खर्च होत आहेत. इतका मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही तिकीट बुडवण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.