नाशिक - दारू पिऊन उशिरा घरी परतलेल्या मुलाला घराबाहेर काढणाऱ्या आईला दारूच्या नशेत मुलाने ढकलल्याने आईचे डोके सिमेंटच्या खांबावर जोरात आदळले. या घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलास अटक करण्यात आली आहे.
दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोके आपटून हत्या, नाशिकमधील घटना - नाशिकमध्ये मुलाकडून आईची हत्या
दारू पिऊन उशिरा घरी परतलेल्या मुलाला घराबाहेर काढणाऱ्या आईला दारूच्या नशेत मुलाने ढकलल्याने आईचे डोके सिमेंटच्या खांबावर जोरात आदळले. या घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
आईचे डोके सिमेंटच्या खांबावर आदळल्याने जखमी -
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेरी कॉलनीमध्ये साठ वर्षीय विमल कचरू पवार या आपला मुलगा प्रशांत कचरू पवार (२८) याच्यासोबत रहात होत्या. नेहमी नशा करणे, दारू पिऊन घरी येणे, हा मुलाचा नित्यक्रम होता. शुक्रवारी (ता.१० डिसेंबर) प्रशांत हा नेहमीप्रमाणे रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला. दारू पिऊन उशिरा आलेल्या प्रशांतला आई रागावली व 'तुला आज घरातच घेणार नाही, असे म्हणून त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाले. आईने त्याला एक-दोन चापटीही मारल्या. त्यावेळी प्रशांतने आईला ढकलले, यात आईचे डोके सिमेंटच्या खांबावर आदळल्याने ती जखमी झाली.
हे ही वाचा- Firing In Shirdi : शिर्डीत युवकावर गोळीबार, एक गोळी घुसली छातीत
दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतला आईला दवाखान्यात नेण्याचेही भान राहिले नाही -
प्रशांतने जखमी अवस्थेत आईला घरात नेऊन झोपवले. दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतला अशाप्रसंगी आईला दवाखान्यात नेण्याचे भानही राहिले नसल्याचे त्याने पोलिसांकडे कबूल केले. पहाटे आई उठत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने जवळील म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत पोलिसांना त्याबाबत सांगितले. घटनास्थळ पंचवटी पोलिसांच्या हद्दीत असल्याने म्हसरूळ पोलिसांनी मेरी चौकीतील कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मेरी चौकीतील बिट मार्शल व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता या महिलेचा श्वास बंद असल्याचे आढळले. प्रशांतला खरा प्रकार काय विचारले असता त्याने सर्व घटनाक्रम कथन केला. वरिष्ठांच्या आदेशान्वये संशयित प्रशांतवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पंचवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.