नाशिक -दोन वर्षाच्या माझ्या मुलीला पतीने हिसकावून नेले. गेल्या सहा महिन्यांपासून मी तिला पाहिले नाही. मुलीला ताब्यात देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु, अजूनही मला मुलीचा ताबा मिळालेला नाही. मला माझी मुलगी द्या यासाठी एका आईने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण केलं आहे. सुवर्णा जगदाळे-बागुल, असे उपोषकर्त्या महिलेचे नाव ( Mother Hunger Strike Get Custody Daughter In Nashik ) आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सुवर्णा जगदाळे-बागुल यांनी म्हटलं की, सहा महिन्यापासून पती निलेश जगदाळे याने आपली 2 वर्षाची मुलगी राही हिला हिसकावून नेलं आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी मला घरातून हाकलून दिले. मुलीचा ताबा मिळावा यासाठी शहादा येथे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अर्ज केला होता. 10 मार्च 2022 रोजी न्यायालयाने अर्ज स्वीकारून स्थानिक पोलीस आणि संरक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु, अजूनही मुलगी मिळू शकलेली नाही. पती मुलीला घेऊन फरार झाला आहे. मुलगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका सुवर्णा यांनी घेतली आहे.