नाशिक - राज्यात ठिक-ठिकाणी कोरोनाबाधित महिला रुग्णांसोबत घडलेल्या विनयभंगाच्या घटनांमुळे महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असतानाच, नाशिक शहरातील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मनपाच्या एका सफाई कर्मचाऱ्याने येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिला रुग्णाला स्वच्छतागृहाजवळ स्त्री जातीला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित कर्मचाऱ्याविरुध्द रुग्णालयातील डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या काही घटना मन सुन्न करतात. अशीच एक संतापजनक घटना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. एक कोरोनाबाधित महिला रुग्ण स्वच्छतागृहात गेली असता संशयित आरोपी मनपा सफाई कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (५६,रा.जुने नाशिक) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर बाहेरून लाथ मारून महिला रुग्ण आतमध्ये असतानासुध्दा लघवी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच महिलेला बघून अश्लील कृत्य केले, महिलेने आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता संशयित आरोपी शिंदे याने तेथून पळ काढला. या घटनेनंतर मनपाचे डॉ. विशाल बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी शिंदे याच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला. दरम्यान, फरार संशयित शिंदे याचा पोलीस शोध घेत आहेत.
सरकारने तत्काळ SOP जाहीर करावी - चित्रा वाघया घटनेनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची सरकारवर कठोर टीका केली आहे. राज्यात कोरोना बाधित महिला असुरक्षित नसून सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 10 ते 12 घटना घडल्या आहेत. यामुळे सरकारने तत्काळ SOP जाहीर करावी असे त्यांनी म्हटले आहे. सरकारला महिला सुरक्षा महत्वाची वाटत नाही का? असा खडा सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच दोषी फक्त कर्मचारीच नाही तर रुग्णालय प्रशासकीय अधिकारीही याला जबाबदार असून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.