नाशिक - शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आता नाशिक पोलीस आयुक्तालयाने देखील शहरातील पोलीस चौक्यांना अत्याधुनिक करत स्मार्ट लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
ठिकठिकाणी असलेल्या पोलीस चौक्यांच्या माध्यमातून दृश्यमान पोलिसिंग होण्यास मदत होईल, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यावेळी म्हणाले.
ज्या पोलिसांवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, त्याच पोलिसांसाठी असलेल्या चौक्यांना बकाल स्वरूप आले होते. जुने साहित्य मोडकळीस आले होते. कोणत्याही चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिसांना कामात उत्साह राहत नव्हता. पोलीस चौक्यांची अवस्था पाहून काहीजण तक्रारी घेऊन जाण्यासही धजावत नव्हते.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत शहरातील 53 पोलीस चौक्या अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी सरकारने 2 कोटींची मदत देऊ केली. तसेच सीएसआर आणि लोकसहभागातून आतापर्यंत शहरात 12 ठिकाणी अत्याधुनिक पोलीस चौक्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही दिवसात आणखी 10
पोलीस चौक्या कार्यान्वित होणार आहेत.
पोलीस चौक्यांमध्ये अत्याधुनिक सुख-सुविधा केल्याने चौक्यांना स्मार्ट लूक मिळाला आहे. ठिकठिकाणी असलेल्या पोलीस चौक्यांच्या माध्यमातून दृश्यमान पोलिसिंग होण्यास मदत होईल, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन जवळच पोलीस चौकीत जाता येईल, असे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी सांगितले.