नाशिक - कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी नाशिकच्या मनपा शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना थेट पारावर धडे देण्यास सुरुवात केली. तसेच 'पुस्तक आले भेटीला' या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न बच्छाव मॅडम करत आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप शाळा बंदच आहेत. खासगी तसचे शासकीय शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. अशात महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मात्र नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 च्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी हा अडथळा पार करत शिक्षणाची गंगा वाहती ठेवली आहे. मागील दोन महिन्यांपासून थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षणाचे धडे बच्छाव मॅडम देत आहेत. शिक्षिका थेट मुलांपर्यंत पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे.
'पुस्तक आले भेटीला'
मनपा शाळा क्रमांक 18 च्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांसाठी 'पुस्तक आले भेटीला' हा उपक्रम सुरू केला आहे. शाळेतील पुस्तके, स्वतःच्या घरातील अवांतर वाचनाची पुस्तके तसेच समाज सहभागातून मिळालेली पुस्तके घेऊन त्या दर आठवड्यातील तीन दिवस आनंदवली गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पारावर विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करतात. या पुस्तकात जनरल सामाजिक ज्ञान, गाणी, गोष्टी, समाजसेवकांचा समावेश आहे.