नाशिक -आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर जरूर टाका, आम्ही आमचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे आदेश पाळणारच, असा इशारा नाशिक मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे ( Nashik CP Deepak Pandey ) यांनी भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला मनसेने आव्हान दिले ( MNS Challenge to Police ) आहे.
मशिदीवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगेखाली उतरण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. राजकीय, सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भोंगे न उतरल्यास मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हटली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी परवानगी शिवाय भोंगे वाजवण्यात सक्त मनाई केली असून विनापरवानगी भोंगे लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
तुरुंगात टाकले तरी चालेल - आम्ही इतरांच्या आदेशापेक्षा राज ठाकरे यांचा आदेश आम्ही पळतो. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्याला घाबरणार नाही, आम्हाला तुरुंगात टाकले तरी 3 मेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्याच्या समोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजणारच, असा इशारा दिलीप दातीर यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.