नाशिक- लॉकडाऊन काळात जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात आज राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढून वीजबिल माफ करण्याची मागणी केली. नाशकातही मनसेच्या वतीने या वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक मनसैनिकांनी गळ्यात वाढीव वीज बिलांच्या माळा घालून टाळ वाजवत आंदोलन केले. तसेच घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा निषेधही व्यक्त केला.
सरकार करते जनतेचे खिसे साफ-
नाशिकच्या मनसे कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील मनसे नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी गळ्यात वाढीव वीज बिलांच्या माळा घालून टाळ वाजवत ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी मनसैनिकांनी "हाती नाही काम आणि एमएसीबीचे तिप्पट दाम","गरीब मंत्र्यांचे वीज बिल माफ, सरकार करते जनतेचे खिसे साफ" आशा प्रकारचे फलक झळकवत वाढीव वीज बिलावरून सरकार विरोधात आंदोलन केले.