नाशिक - मित्राने मोबाईल आणि मोटरसायकल घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याने एका 15 वर्षांच्या मुलीने आपल्याच नातेवाईकांच्या घरात चोरी केली. यामध्ये सुमारे 6 लाख 59 हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. दरम्यान, याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अल्पवयीन बालिका आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.
मित्राला मोबाइल-दुचाकी घेण्यासाठी मुलीची नातेवाईकांच्या घरात चोरी; वाढदिवसाच्या दिवशी साधला डाव शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार नोंदवण्यात आली होती. यामध्ये सुमारे 6 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज घरातून चोरल्याचे नमूद करण्यात आले होते.
तक्रारदार कुटुंबीयांना घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मुंबई नाका पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुटुंबीयांच्या मदतीने संशयित मुलीकडे विचारपूस केली. यानंतर चौकशी दरम्यान तिने मित्राला मोबाईल आणि गाडी घेण्यासाठी चोरी केल्याचे सांगितले. संबंधित मित्र यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी करत असल्याची कबुली मुलीने दिल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.
मुंबईनाका पोलिसांनी या मुलीला आणि मित्र दीप धनंजय भालेराव यांना ताब्यात घेतले आहे. तसेच संबंधित मुलाकडून सुमारे सव्वा तोळे सोने, 5 ग्रॅम चांदी आणि 26 हजार रुपये असा सुमारे 6 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे,साजिद मन्सूरी आणि पथकाने अवघ्या दोन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून याप्रकरणी पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.
वाढदिवसाच्या बहाण्याने चोरी
तक्रारदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घरी आलेल्या आपल्याच नंदेच्या नातीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. या माहितीवरून मुंबईनाका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी तपासादरम्या संबंधित चोरी 15 वर्षाच्या नातीनेच केल्याचे केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मित्राला गाडी आणि मोबाईल घेण्यासाठी ही चोरी केल्याचे अल्पवयीन आरोपीने सांगितले.
शनिवारी अल्पवयीन मुलगी आजीसोबत नातेवाईकांच्या घरी वाढदिवसानिमित्त गेली होती. या वेळी तिने रात्रीच्या सुमारास नातेवाईकांच्या घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 6लाख 59 हजारांचा ऐवज चोरला. यानंतर तिने सकाळच्या सुमारास दिप धनंजय भालेराव या मित्राला नातेवाईकांच्या घराजवळच बोलवून चोरलेला ऐवज दिला. यानंतर मुलगी स्वघरी परतली.