नाशिक -अमेरिकेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिका संसद भवनात घुसून तोडफोड, हाणामारी केली. या घटनेमुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले हे ट्रम्प यांच्यावर चांगलेच नाराज झाले असून ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेले कृत्य लोकशाहीला शोभणारे नसून ट्रम्प यांनी पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर केला आहे. या कृत्यामुळे त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला आहे. हा लोकशाहीचा अवमान असून भारतातही आमची नाचक्की होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी पराभव स्वीकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.