नाशिक- शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून, याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना या संदर्भात आढावा घेण्याचे आदेश दिले होते. ठाकरेंच्या सूचनेनुसार, दादा भुसे यांनी नाशिक महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक घेतली. यात त्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश तसेच महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवावे, त्याच बरोबर खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये देखील आवश्यक त्या व्यवस्था करुन नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर, आता नाशिक शहरात कोरोनाचे रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर, शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालेगावात कोरोना नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कृषीमंत्री भुसे यांना नाशिकमध्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार भुसे यांनी नाशिक महापालिकेला भेट देऊन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक शहराच्या कोविड रुग्णांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.