महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी पत्करावा लागणार धोका, पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय नाही - छगन भुजबळ - छगन भुजबळांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना इशारा

अर्थव्यवस्था सुरळीत करणे आवश्यक असून त्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेता येणार नाही. परंतु कोणत्याही क्षणी तो वाढवण्यात येऊ शकतो. यासाठी नागरिकांनी घरातच बसून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

nashik
आढावा बैठक घेताना मंत्री छगन भुजबळ

By

Published : Jun 17, 2020, 4:03 PM IST

Updated : Jun 17, 2020, 4:41 PM IST

नाशिक- लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी हा धोका पत्करावा लागणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते जिल्ह्यातील कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावावर विशेष आढावा बैठकीत बोलत होते.

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी पत्करावा लागणार धोका, पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय नाही - छगन भुजबळ

यावेळी ते म्हणाले, की अर्थव्यवस्था सुरळीत करणे आवश्यक असून त्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेता येणार नाही. परंतु कोणत्याही क्षणी तो वाढवण्यात येऊ शकतो. यासाठी नागरिकांनी घरातच बसून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना यावेळी दिले आहेत.

'कर्तव्यावर हजर न होणारे अधिकारी-कर्मचारी करणार बरखास्त'

सध्याच्या बिकट परिस्थितीत प्रत्येक करोना योध्याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यामुळे ज्यांना नियुक्ती देऊनही जे यायला तयार नाहीत, त्यांना बरखास्त करणार आहोत. त्यामुळे कर्तव्यावर हजर न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीप पेरणीला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटप सुरळीत करण्यासाठी बँकांसोबत चर्चा करणार आहोत. निसर्ग वादळग्रस्तांना निधी उपलब्ध झाल्यानंतर वाटप करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे राहणार उभे'

महत्त्वाचे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड १९ टेस्टिंग लॅब तयार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचवेळी त्यांनी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले असून याबाबत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आम्ही सर्व भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

'करोनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये काही जागा ठेवणार राखीव'

राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर ते म्हणाले, की शाळा ऑनलाईन सुरू करणे हे मुलांसाठी आवश्यक आहे. ज्ञानदानाचे चक्र सुरू रहायला हवे. परंतु सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारलाही काळजी आहे. करोनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये काही जागा राखीव ठेवणार असून यासोबत काही खासगी हॉस्पिटलसोबतही बोलणे सुरू असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jun 17, 2020, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details