नाशिक - लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ज्या-त्या राज्याने परिस्थिती बघून घ्यायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबतचा ( Lockdown In Maharashtra ) निर्णय राज्य सरकारच घेईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ( Minister Bharti Pawar ) यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत आरोग्य विभागाशी झालेल्या चर्चेदरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope On Lockdown ) यांनी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लिमीट राज्य क्रॉस करत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन लावता येणार नाही, असा निकष सांगितला आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यात लॉकडाऊन लागेल, असं वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.
15 ते 18 वयोगटासाठी पुरेशा लसीचा साठा उपलब्ध -
आजपासून देशभरात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचा शुभारंभ आज केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याहस्ते नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटल येथे करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. जितेंद्र धनेश्वर डॉ. रत्नाकर पगारे यावेळी उपस्थित होते. त्यासाठी आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलांचे लसीकरण करता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या लसीकरणात कोव्हॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी कोविन अॅपवर शनिवारपासून नोंदणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा निर्धार आरोग्य यंत्रणेने केला असून त्यासाठी पुरेशा लसीचा साठा उपलब्ध आहे.