नाशिक- स्मार्ट सिटीचे मुख्य अधिकारी प्रकाश थविल यांची तातडीने बदली करा, असे आदेश नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. नाशिक महानगर पालिकेत ग्रीन फिल्ड बाबत महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक बोलत असताना थविल हसत होते, अनेकदा असे आढळून आल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. त्यावेळी त्यांच्या निलंबन किंवा बदलीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरून थविल यांचे बेजबाबदार वागणे, असा ठपका ठेवत प्रशासनाने त्वरित बदलीची कारवाई करावी, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामकाजावर वादळी चर्चा झाली. विशेषत: प्रकाश थविल यांना दुरध्वनी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी तक्रार केली तेव्हा थविल हे हासत होते. त्यामुळे थविल यांच्या कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. शिवाय त्यांना महापालिकेकडून कंपनीला किती निधी मिळाला? २१ कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याची रूंदी किती हेसुद्धा सांगता आले नाही. त्यामुळे आवाक झालेल्या सर्वच नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली होती.