नाशिक- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. मात्र सर्व नेते व आंदोलक जमिनीवर बसले असताना भुजबळांना बसण्यासाठी खुर्ची दिल्यावरून मराठा आंदोलक संतप्त झाले. राजे जमिनीवर बसले असताना भुजबळांना बसण्यास खुर्ची का दिली, म्हणून आंदोलकांनी विरोध केला. पुढे गोंधळ वाढू नये म्हणून, खुद्द संभाजीराजेंनी हस्तक्षेप करत भुजबळांना खाली बसण्यास अडचण आहे, त्यांना खुर्चीवर बसू द्या. असे म्हटल्यावर आंदोलक शांत झाले.
संभाजीराजेंच्या सांगण्यावरुन मिटला वाद
नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृह जवळील मैदानात मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा क्रांती मुक आंदोलन करण्यात आले होते. मराठा आंदोलनाप्रसंगी भूमिका मांडण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे आधीच आंदोलन स्थळी पोहोचले असून ते जमिनीवर बसले होते. त्यानंतर एका मागोमाग एक लोकप्रतिनिधी आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आंदोलनस्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची देण्यात आली. भुजबळ यांना बसायला खुर्ची दिली म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. संभाजीराजे खाली बसले असताना भुजबळांना खुर्ची दिल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अशात कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे स्वतः समोर आले. भुजबळ यांना खाली बसायला अडचण आहे, त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसू द्या, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले त्यानंतर वाद मिटला. छगन भुजबळ यांनी देखील आंदोलनस्थळी मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल खुलासा करत मला पाठीचा त्रास असल्याने मी खुर्चीवर बसलो होतो असे म्हंटल.