नाशिक - जिल्ह्याला तिसर्या टप्प्यातच ठेवत निर्बंध पुर्वीप्रमाणे 'जैसे थे' ठेवण्यात आले असले तरी सोमवारपासून (दि.२१) ५० टक्के क्षमतेने माॅल उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत माॅल खुले ठेवता येणार असून तेथील कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी कोरोना परिस्थिती आढावा बैठकीत माॅल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेला लाॅकडाऊनमुळे अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होते. त्यानंतर कोरोना संसर्गाचा आलेख खालावल्याने व अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याने राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याचा तिसर्या टप्प्यात समावेश केला. त्यामुळे अत्यावश्यक इतर दुकानेही दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली. मात्र, माॅल सुरु करण्यास परवानगी नाकारली होती. कोरोना लाट ओसरल्यामुळे अटी शर्तीसह माॅल सुरु करण्यास परवानगी द्यावी ही मागणी जोर धरत होती. अखेर शनिवारी झालेल्या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेत माॅल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत माॅल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे शहर व जिल्हयातील माॅल चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेले माॅल पुन्हा सुरु होणार असल्याने अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होणार आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर उतरले त्यांचे स्वागत - भुजबळ
जनगणना डाटाबाबत केंद्राकडे अनेक वेळा पत्रववहार केला. मात्र उत्तर द्यायला केंद्र सरकार टोलवाटोलवी करत आहे. कोरोना काळात कोण सर्व्हे करणार आहे तो डाटा केंद्रानं द्यावा या मागणीसाठी सुप्रिम कोर्टात राज्य सरकार जाईल, असा इशारा भुजबळ यांनी दिला. ओबीसी संघटनाही दावा दाखल करणार आहे. वेळप्रसंगी भाजपची मदत घेऊ. ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर उतरले त्यांचे स्वागत करत त्यांनी या केंद्रकाडे पाठपुरावा करावा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.