नाशिक - बंडखोर आमदार दादा भुसे शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेनेचा बुरुज ढासळला आहे. पक्षनिष्ठा पेक्षा त्यांनी मित्रप्रेमाला प्राधान्य देत शिंदे गटात दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे. धर्मवीर चित्रपटातून दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वांसमोर आली. त्यात ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही आणि एकनाथ शिंदे यांचे तरुणपणाचे मित्र ( Dada Bhuse Join Eknath Shinde Group For Friendship ) आहेत.
भुसेंना शहरातून विरोध, मतदार संघातून समर्थन - मालेगाव व परिसरातील भुसे समर्थकांनी पाठिंब्यासाठी सोशल मीडियावर 'सदैव आपल्या सोबत', 'जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी', 'जिथे तुम्ही तिथे आम्ही', 'एकच वादा ओन्ली दादा', असे स्टेटस ठेवले आहेत. मात्र, दुसरीकडे नाशिक शहरात दादा भुसेंना शिवसैनिकांचा प्रचंड विरोध दिसून आला. शिवसेना कार्यालयापासून बंडखोरांची तिरडी बांधून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. 'गद्दारांना थारा नाही' अशा घोषणा देत नाशिकच्या शिवसैनिकांनी बंडखोर नेते दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांचे फोटो लावून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आहे. तसेच, यापुढे गद्दारांना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.