नाशिक -राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 7 जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे नाशिक पहिल्या नव्हे तर तिसर्या टप्प्यात येत असल्याने त्यानुसार जिल्हयात निर्बंध लागू राहणार आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यावर विचार विनिमय करण्यात येऊन फेरबदल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
नाशिकचे तीन टप्पे
राज्य सरकारकडून अनलॉक बाबत 4 जूनला मध्यरात्री आदेश जारी करण्यात आला आहे. जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथे लॉकडाऊन राहणार नाही. नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र नाशिकचे तीन टप्पे आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्र, मालेगाव महापालिका क्षेत्र, ग्रामीण भाग त्यामुळे या प्रत्येक भागाची कोरोना सद्यस्थिती आणि आकडेवारी बघून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात रूग्णसंख्या कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकूणच परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. अनलॉकची प्रक्रिया राबवताना पाच टप्पे करण्यात आले असले तरी स्थानिक परिस्थिती पाहता यात फेरबदल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.