नाशिक -कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने वैद्यकीय विभागातील ७०० जागांसाठी मानधनावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, तुटपुंज्या मानधनावर जीव जोखमीत घालणारी ही नोकरी कोणीही करायला पुढे येत नसल्याने पालिका प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नाशिक महानगरपालिकेने वाढती करोनाबाधितांची संख्या लक्षात घेत, शहरात विविध ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आणि कोविड सेंटरची उभारणी केली आहे. मात्र, या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या सुविधा वापराविना पडून आहेत. त्यानमुळे पालिकेने आरोग्य विभागातील ७०० जागांसाठी मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुटपुंज्या मानधनावर काढण्यात आलेली नाशिक महानगरपालिकेची नोकरभरती अडचणीत हेही वाचा -महाराष्ट्रात गुरुवारी 9 हजार 895 नवीन कोरोना रुग्ण, 298 मृत्यू
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने फिजिशियन, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टफ नर्स, समुपदेशक आणि हेल्थ वर्कर अशा १३ पदांसाठी ७०० लोकांची भरती सुरू केली आहे. मात्र, यातील स्टाफ नर्स आणि हेल्थ वर्कर या जागांसाठी १७ ते ७ हजार रुपये इतके कमी मानधन आणि केवळ तीन महिन्यासाठी ही नोकरी असल्याने तरुणांनी या भरतीवर नाराजी व्यक्त करत पाठ फिरवली आहे.
खरेतर नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यापूर्वीच इतर शहरांमधील परिस्थितीचा अंदाज घेऊन पालिकेने याबाबत पुर्वीच नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेला आलेल्या उशिराच्या शहाणपणामुळे पालिकेच्या अडचणीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर जीव जोखमीत घालून अवघी तीन महिन्याची नोकरी करण्यास उमेदवार तयार होणार का, हे पहावे लागेल.