महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट; संसर्गाच्या भीतीने ग्राहकच नसल्याने कापड व्यावसायिक अडचणीत - नाशिकमध्ये कापड दुकानदार त्रस्त

नाशिक जिल्ह्यातील कापड व्यवसायही लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडला आहे. 1 जूनपासून सरकारने सर्व व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली असली, तरी कोरोनाच्या धास्तीने दुकानात ग्राहक येतच नसल्याची खंत कापड दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

nashik
कापड दुकान

By

Published : Jun 17, 2020, 3:44 PM IST

Updated : Jun 17, 2020, 10:01 PM IST

नाशिक- कोरोनाच्या भीतीने नाशिकचा कापड व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुकानात ग्राहक येतच नसल्याने कापड दुकानदार त्रस्त झाले आहेत. दुकान सुरू ठेवणे म्हणजे लाइट बिलाचा देखील खर्च निघेल का, अशी चिंता त्यांना भेडसावत आहे.

कोरोना इफेक्ट; संसर्गाच्या भीतीने ग्राहकच नसल्याने कापड व्यावसायिक अडचणीत

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून नाशिक जिल्ह्यातील कापड व्यवसायही अडचणीत सापडला आहे. 1 जूनपासून सरकारने सर्व व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली असली, तरी कोरोनाच्या धास्तीने दुकानात ग्राहक येतच नसल्याची खंत कापड दुकानदारांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील 1500 ते 2000 रिटेलर कापड व्यावसायिक असून 50 ते 60 होलसेल व्यापारी आहेत. जिल्ह्यात गुजरात, दिल्ली, लुधियाना, बनारस, बंगळुरू आदी ठिकाणाहून साड्या, ड्रेस मटेरियल येते. मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याठिकाणी कामगारांअभावी कपड्यांचे उत्पादन झाले नसल्याने कपडा कमी प्रमाणात येत आहे.

लग्न सोहळ्यावर बंधन...

यावर्षी मार्च, एप्रिल, मे, जून हा काळ लग्नसराईचा होता. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना लग्न समारंभ पुढे ढकलावे लागले आहेत. तर काही ठिकाणी शासन नियमानुसार 50 जणांच्या उपस्थितीत छोटेखानी लग्न समारंभ पार पडले. अशा समारंभात फक्त वधू-वरांचे कपडेवगळता इतर पाहुणे मंडळींचे कपडे देऊन आदरातिथ्य करणे टाळल्याने देखील कापड व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद

परिवारात आनंदाचे सोहळे असल्यावर ग्रामीण भागातील ग्राहक शहरात कपडे खरेदी करण्यासाठी येतात. मात्र अद्याप सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहक शहरातील दुकानात येत नाही. त्याचा देखील परिणाम कापड व्यवसायावर झाला आहे.

कापड दुकानातील चेंजिंग रूम बंद..

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच कापड दुकानांमध्ये चेंजिंग रूम बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे कपडे परिधान करून पाहणे अशक्य बनले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकदा घेतलेले कपडे पुन्हा बदलून देण्यास मनाई करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

दुकानातील कामगारांवर देखील आर्थिक संकट

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात आर्थिक चक्र सुरू राहावे, यासाठी सरकारने नियम अटी घालत सर्व व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र अद्याप देखील सर्व व्यवसाय पूर्व पदावर आले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील कापड दुकानांमध्ये कामगारांची संख्या देखील 6 ते 7 हजार इतकी आहे. मात्र दुकानात ग्राहकच येत नसल्याने अनेक दुकानदारांनी काही दिवसांसाठी कामगार कपात केली आहे. त्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details