नाशिक -गोदावरी नदी रामकुंडावर भावपूर्ण वातावरणात लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात ( Lata Mangeshkar Bones Immersion Godavari River ) आले. अरुणा-वरुणा आणि गोदावरीच्या संगमावर शास्त्रोक्त पद्धतीने, विधीवत कलशपूजन करून अस्थींचे विसर्जन केले गेले. यावेळी मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.
लता मंगेशकर यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज सकाळी मंगेशकर कुटुंबीय नाशिकला दाखल झाले. महापालिकेच्या वतीनं, रामकुंडावर शामियाना उभारून पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मंगेशकर घराण्याचे उपाध्ये वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे आणि गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कलशपूजनासह सर्व धार्मिक विधी केले गेले. त्यानंतर रामकुंडावर शास्त्रोक्त पद्धतीनं 11 वाजून 10 मिनिटांनी अस्थींचे विसर्जन करण्यात आले. लता मंगेशकर यांचे भाचे आदिनाथ यांनी सर्व विधी पार पाडले.