नाशिक -जमिनीच्या वाढत्या भावामुळे भूमाफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या टोळ्यांकडून जमीन मालकांवर साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा भूमाफियांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यानी सांगितले आहे.
मृताच्या नातेवाईकांना न्याय दिला जाईल
नाशिकच्या आनंदवली भागामध्ये रमेश मंडलिक या सेवानिवृत्त एसटी कंडक्टरची 17 फेब्रुवारीला अज्ञातांनी निर्घूण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या हत्या प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणाचे भूमाफिया कनेक्शन उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक कुमार पांड्ये यांनी दिली आहे. गंगापूर रोडवर मंडलिक खून प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ संशयितांना अटक केली असून, तपासाअंती या हत्या प्रकरणात भूमाफिया कनेक्शन उघडकीस आले. यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करण्यात येईल तसेच या माफियांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई केली जाईल आणि मृताच्या नातेवाईकांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त दीपक कुमार पांड्ये यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे..