नाशिक - शासकीय विश्रामगृह येथे सराफा व्यावसायिक विजय बिरारी यांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना घडली त्यावेळी बिरारी हे हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, याचे गूड कायम असले, तरी नाशिक पोलिसांनी आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. हे प्रकरण गंभीर असल्याने घटनेचा तपास न्यायालयीन समिती आणि सीआयडीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा सराफ व्यावसायिकांनी पुकारलेले बेमुदत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथील चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून बिरारी हे हैदराबाद पोलिसांच्या सोमवारपासून ताब्यात होते. ते भाजपच्या व्यापारी संघटनेचे राज्य पदाधिकारी होते तर, त्यांची पेठरोडवरील शनी चौकात सराफी पेढी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचे गूढ मात्र अजूनही कायम आहे. बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करत हैदराबाद पोलिसांनीच ही हत्या केली, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.