नाशिक -राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत महापालिका हद्दीत काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना सर्वेक्षणाचा मोबदला त्वरित देण्यात यावा. तसेच त्यांना दिवाळी बोनस मिळावे, या मागणीसाठी सोमवारी आयटकच्या वतीने नाशिक महापालिकेबाहेर आंदोलन करण्यात आले.
आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यासाठी आयटकचे महापालिकेसमोर आंदोलन
राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत महापालिका हद्दीत काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना सर्वेक्षणाचा मोबदला त्वरित देण्यात यावा. तसेच त्यांना दिवाळी बोनस मिळावे, या मागणीसाठी सोमवारी आयटकच्या वतीने नाशिक महापालिकेबाहेर आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळात कोरोना योद्धांच्या बरोबरीने आशा गटप्रवर्तक देखील काम करत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी, मिशन झिरो नाशिक यांसह विविध शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम केले. मात्र या आशा गटप्रवर्तकांना अद्यापही सर्वेक्षणाचा मोबदला देण्यात आलेला नाही. तसेच महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. मात्र यातून आशा गटप्रवर्तकांना वगळण्यात आले. यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते व आशा गटप्रवर्तक संघटना यांच्यावतीने महापालिकेबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देखील देण्यात आले.
मनपा प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करून अशा आणि गटप्रवर्तक यांना थकीत मानधन द्यावे. तसेच दिवाळीचे बोनसही देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याच बरोबर शहरी भागामध्ये 25 आशा मागे एक गटप्रवर्तकाची नेमणूक करण्यात यावी. शहरी भागातील आशांना कामाचा मोबदला वितरीत करताना मिळालेल्या मोबदल्याची पावती देण्यात यावी. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आला आहे.