नाशिक -देशात महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे, जिथे कोरोना संकटातही उद्योग शंभर टक्के सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांना रोजगार मिळाला. उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र टास्कफोर्सची निर्मिती केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे.
फोन टॅपिंग प्रकरण: विरोधकांवर हेरगिरी करणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल- सुभाष देसाई 'महविकासअघाडी सरकार पाच वर्ष टिकेल'
उद्योगमंत्री सुभाष देसाई नाशिक दौर्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाकाळात उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सरकारवर परिणाम होणार नाही. महविकासअघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, असा दावा त्यांनी केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना चुकीचे काम केले असेल तर ते उघड होईल आणि त्याचे फळ देखील भोगावे लागेल. राजकीय नेते, विरोधकांवर हेरगिरी करणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल. शिवसेनेचे खासदार या संदर्भात वाचा फोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'सवलती दिल्यामुळे कोट्यवधी कामगारांचा रोजगार सुरू राहिला'
कोरोना महामारीच्या काळामध्ये केवळ महाराष्ट्रातच उद्योग सुरू होते इतर राज्यांमध्ये उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक अडचणी त्यांना येत आहेत. कोरोना काळात महाराष्ट्रात उद्योग सुरू झाल्यामुळे कामगारांना रोजगार मिळाला, राज्य सरकारने उद्योगाकरता अनेक योजना राबवल्या, सवलती दिल्यामुळे कोट्यवधी कामगार हे बेरोजगार होण्यापासून वाचले आहेत. मुख्यमंत्री नेहमी उद्योजकांशी ऑनलाइन बैठका घेऊन कोरोनाकाळात लसीकरण कामगारांचे, आरोग्याचे प्रश्न जाणून घेत योग्य त्या उपाययोजना करत आहेत. असे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्यातील उद्योगांना उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
हेही वाचा -Pegasus spyware : मोदींनी सर्व पापांची सीमा ओलांडली - कुमार सप्तर्षी