नाशिक -रक्षाबंधन सण जवळ आल्याने महिला वर्गाची राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. मात्र, यंदा इतर राख्या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या राख्यांना महिला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.
नाशिकमध्ये मोदी राखीला वाढती मागणी - Narendra Modi photo on Rakhi
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या राख्यांना महिला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.
![नाशिकमध्ये मोदी राखीला वाढती मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4119593-thumbnail-3x2-pawarjpg.jpg)
रक्षाबंधन सण हा भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त नाशिकच्या प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि एम.जी रोड भागात राख्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. या ठिकाणी महिलावर्ग राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. या दुकानात पारंपारिक राख्या सोबतच डिझायनर आणि कार्टूनच्या राख्याचा समावेश आहे. मात्र, या सोबतच मोदींचे छायाचित्र असलेल्या राखीला महिलांची पसंती मिळत असल्याचे दुकानदार सांगतात. अनेक दुकानात मोदींचे छायाचित्र असलेल्या राख्या काही तासांतच संपल्याचे दुकानदारांनी सांगितले.
काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर मोदींची नागरिकांमध्ये क्रेझ अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात मोदींकडे बघून भाजपला मतदान केल्याचे दिसून आले होते. मागील वर्षीच्या रंगपंचमीत सुद्धा मोदींचे छायाचित्रे असलेली पिचकारी तसेच वॉटर टँकला ग्राहकांची पसंती दिसून आली होती.