नाशिक - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. जर दुर्दैवाने कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर सर्वसामान्य नागरिकांची धावपळ होत असते. संबंधित संसर्ग झालेल्या बाधिताला कोणत्या दवाखाण्यात दाखल करायचे, तिथे कोणत्या प्रकारचे रुग्ण आहेत. या सर्व बाबींची माहिती आता सामाजिक बांधिलकीतून नाशिकच्या क्रेडाईने तयार केलेल्या 'हेल्थ प्राईम नाशिक' या अॅपमुळे एका क्लिकवर प्राप्त होणार आहे.
कोरोनाविरुद्धची लढाई लढताना महत्वाची माहिती मिळविण्यासाठी हे अॅप महत्वपुर्ण ठरेल, असा विश्वास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अॅपच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी नाशिक महानगरपालिका महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेविका समीना मेनन, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, महापालिका नाशिक शहर नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...नागपुरात जगातील सर्वांत मोठे प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्र; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी, या अॅपमुळे रुग्णालयात असणाऱ्या बेड्सची संख्या, आयसीयुतील बेड्स, महापालिकेचे आरक्षित बेड्स, नॉन कोविड बेड्सची आणि खासगी बेड्सची माहिती मिळणार असून रुग्णांची स्थिती, आजारानुसार रुग्णांचे वर्गीकरण यांची देखील माहिती या अॅपवर मिळणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकच्या नागरिकांसाठी क्रेडाईने चांगली व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र, यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व दवाखान्यांमध्ये एक संपर्क अधिकारी नेमण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना एकाच संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करता येईल. तसेच, रुग्णाला कोणत्या रुग्णालयात पाठवायचे, याबाबत मदत होईल, असेही भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हेल्थ प्राईम नाशिक अॅपचे लोकार्पण कोरोनाविरुद्धची लढाई लढताना शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी नाशिकमधील सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काही जबाबदारी उचलायला हवी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. तसेच नाशिक क्रेडाईने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था निर्माण केल्याबद्दल क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांचे भुजबळ यांनी आभार मानले.