नाशिक : नाशिक येथे देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते झाले. उद्घाटन करताना ते म्हणाले, नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरू झाले असून, ही बाब नक्कीच नाशिक शहर, जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. तसेच, या ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती होणार असून, जागरूकता वाढणार आहे.
ग्राहक प्रबोधन केंद्राचे स्थान : वैधमापन शास्त्र विभाग, महानगर पालिका व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक पार्क, मुंबई नाका या संस्थेच्या आवारात कायमस्वरुपी देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल उपस्थित होते.
ग्राहकांना हक्काची माहिती होईल : पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ग्राहकांच्या तक्रारी नेहमी येत असतात. ग्राहक नेहमी फसविला जात असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसेल. ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहक जोडले जाऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ग्राहक प्रबोधन केंद्र राज्यातील प्रत्येक विभागात सुरू करावेत. त्यानंतर जिल्हास्तरावर ग्राहक प्रबोधन केंद्र उभारण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्राहकांपर्यंत माहिती पोहचेल :डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी यावेळी ग्राहक प्रबोधन केंद्रांची आवश्यकता व उपयुक्तता सांगितली. ते म्हणाले की, ग्राहक संरक्षण आणि वैधमापन शास्त्र विभागाचे काम माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत असते. वैधमापन शास्त्र विभागासाठी ग्राहक प्रबोधन केंद्र एक नवी सुरुवात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व नोंदी घेतल्या जात असल्याने या विभागाचे पारदर्शकपणे सुरू आहे. तसेच, या विभागाचे अधुनिकीकरण होणे आवश्यक असल्याने मंत्री भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात नवीन लॅपटॉप व संगणक व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तसेच, या केंद्राचा उपयोग जास्तीत जास्त ग्राहकांनी करून आपली फसवणूक टाळावी, असेही सिंगल यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :Fake Product Reviewers : ई-कॉमर्स वेबसाईटवरील रिव्हिव्यूवची ग्राहक व्यवहार विभाग करणार तपासणी