नाशिक- जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडा उलटूनही नाशिक शहर परिसरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने येत्या सात दिवसात शहर परिसरात पाऊस पडला नाही तर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २५ टक्के पाणीसाठा..
जुलै महिना उजाडला तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात एकूण २४ मोठे व मध्यम धरण प्रकल्प असून यात सध्या फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही सध्या ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी हा कमी आहे. या सर्व परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्याचा पाणीसाठा आणि शहराची गरज याचा आढावा महापालिकेकडून घेण्यात आला असता पुढच्या आठवड्यात पाऊस येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.मात्र जर असे झाले नाही तर येत्या सात दिवसात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
नाशकात गंगापूर धरण परिसरात पाऊस न झाल्यास पाणी कपातीचा निर्णय घेणार.. काटेकोरपणे नियोजन करून पाणी वापरा..
सद्यस्थितीत नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर झाले. मात्र पुढील आठवड्यापासून हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे पाऊस न पडल्यास नाशिककरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. मुबलक पाणी उपलब्ध असले तरीही नाशिककरांनी पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पेरणी झालेल्या भागात दुबार पेरणीचे संकट..
गंगापूर धरण समूहात जूनच्या सुरुवातीला ४६ टक्के जलसाठा होता. मात्र पावसा अभावी धरणाची पाणी पातळीत दहा टक्याने खालावली आहे. गंगापूर धरण समूहात ३५ टक्के जलसाठा उरला आहे. तर इतर धरणांचीही तीच परिस्थिती आहे. दारणा धरण समूहात २६ टक्के, पालखेड धरण समूह १३ टक्के तर गिरणा खोरे धरण समूहामध्ये २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जुलै महिना उजाडला असून पाहिजे त्या प्रमाणात पावसाचे आगमन झालेले नाही. सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसानंतर अनेक ठिकाणी पेरणी करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी झालेल्या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.