नाशिक - इंदिरानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये ११ युवक-युवतींना हॉटेल प्रशासनकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. खोलीत बंदिस्तही करण्यात आले. दरम्यान आता याप्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे.
८ तासांची ड्युटी असतानाही तासन् तास काम
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना हॉटेल व्यवस्थापनाने दमदाटी करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी भारतातील नामवंत हॉटेल्समध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ट्रेनिंग दिले जाते. याच ट्रेनिंगसाठी भारताच्या अनेक ठिकाणाहून जवळपास ११ विद्यार्थी नाशिकच्या या हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दाखल झाले होते. मात्र आठ तासांची ड्युटी असतानादेखील हॉटेल व्यवस्थापन या मुलांकडून तासन् तास काम करून घेत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच परीक्षा असल्याने या विद्यार्थ्यांनी परत जाण्यासाठी परवानगी मागितली असताना हॉटेलमधील स्टाफने त्यांना रूममध्ये डांबून ठेवत मारहाण केली आहे.