नाशिक -नाशिकच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचारासाठी घेतले डिपॉझिटचे पैसे परत देण्यासाठी रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत होते. प्रशासनासमोर आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे आणि नातेवाईक अमोल जाधव यांनी अंगावरील कपडे काढून आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाने दीड लाख रुपये परत केले. मात्र, या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा -नाशिकच्या रतन लथ यांची राज्यपालांविरोधात जनहित याचिका
नाशिकच्या सिन्नर येथील रहिवासी अमोल जाधव यांनी आपल्या आई, वडिलांना कोरोना उपचारासाठी नाशिकच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. चौदा दिवसांच्या उपचारापोटी त्यांनी मेडिक्लेमच्या माध्यमातून सुमारे दहा लाख रुपयांचे बिल अदा केले. रुग्णांना दाखल करताना त्यांनी दिड लाख रुपये डिपॉझिटही भरले. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जाधव यांनी आपली डिपॉझिटची रक्कम परत मिळवण्यासाठी रुग्णालयाकडे पाठपुरावा सुरू केला. जाधव हे एका कंपनीत सात हजार रुपये पगारावर काम करतात. डिपॉझिट भरण्यासाठी व्याजाने पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वारंवार रुग्णालयाचे हेलपाटे मारूनही रुग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.