नाशिक- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये दिसून आला आहे. शहरातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या तर, रस्त्यावर काही होर्डिंग देखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी नाकेबंदीसाठी रस्त्यावर उभारलेले कापडी मंडप देखील उडुन गेले आहेत.
पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज
नाशिक शहर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. रविवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. शहरात दुपारनंतर उन-सावलीचा खेळ सुरु होता. शहरातील पंचवटी, सिडको, पाथर्डी, उपनगर या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळामुळे सातपूर, गंगापूर रोड, सिडको परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. तसेच जिल्ह्यातील सटाणा, मनमाड, मालेगाव या तालुक्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.